शाखेचे मॅनेजर सुहास नाडगौडा यांची माहिती
वार्ताहर/उचगाव
येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित आठराव्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे नेतृत्त्व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी उचगाव शाखेच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती शाखेचे मॅनेजर सुहास नाडगौडा यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
येथील मराठी साहित्य संमेलनातील गंथदिंडीमध्ये दरवर्षी वेगळेच आकर्षण असते. एक वैशिष्टय़पूर्ण ग्रंथदिंडीचा सोहळा म्हणून पाहिला जातो. ग्रंथदिंडीमध्ये यापूर्वी हत्ती, घोडे, रथ, लेझीम पथक, लाठी मेळा, ढोल, ताशे, वारकरी सांप्रदाय, महिला भजनी मंडळ, युवकांनी सजविलेले चित्ररथ, मुलींचे झांजपथक, बैलजोडय़ा, या भागातील विद्यार्थी वर्गाकडून सजलेल्या वेगवेगळय़ा देखाव्यांचे आकर्षक देखावे, पुरुष, महिला, विद्यार्थी असा भरगच्च कार्यक्रम या ग्रंथदिंडीमध्ये दिसून येतो.
2000 साली उचगाव मराठी साहित्य संमेलनाची पहिली मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आणि संपूर्ण बेळगाव तालुक्यामध्ये उचगाव साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने व संमेलनाने सर्वांनी मने जिंकली इतका देखणा शिस्तबद्ध सर्वच कार्यक्रम झाला. तेव्हापासून आजतागायत संमेलन व ग्रंथदिंडीची पातळी दिवसेंदिवस वाढतच आहे.
पश्चिम भागात सरकार क्षेत्रात एक विश्वासास पात्र ठरलेली व प्रत्येकाच्या मनात विराजमान झालेली लोकमान्य सोसायटी विविध क्षेत्रात सातत्याने नागरिकांच्या हिताच्यादृष्टीने जनतेला सहकार्य करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवून सहकार्य करत असते. आणि याचाच एक भाग म्हणून उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीची धुरा या वर्षी लोकमान्य सोसायटी उचगाव शाखेने घेतली आहे. सदर ग्रंथदिंडी यावर्षीही नेटकी, रुबाबदार होण्यासाठी शाखा मॅनेजर सुहास नाडगौडा, उमेश वेताळ, बबन फर्नांडिस, अनंद देसाई यांनी संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, सेक्रेटरी एन. ओ. चौगुले, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील, तसेच कार्यकारिणीशी विचारपूस, नियोजन, आराखडे सध्या सुरू आहेत.