प्रतिनिधी/बेळगाव
बसवेश्वर उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर केवळ सहा महिन्यातच दुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वी एका बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. सोमवारपासून दुसऱया बाजूच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून रस्ता बंद करण्यात आला आहे.
बसवेश्वर उड्डाणपुलावरील रस्ता खचल्याने पावसाळय़ात मोठी समस्या निर्माण झाली होती. पण तात्पुरती डागडुजी करून रस्ता वाहतुकीस सुरू ठेवण्यात आला होता. मात्र, रस्ता खूपच खराब झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले होते. यामुळे मागील महिन्यात एका बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक वळवून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले होते. पण दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. हा रस्तादेखील खराब झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दुसऱया बाजूच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे दि. 24 रोजी रस्ता बंद ठेवून दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. पण प्रजाकसत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता खुला ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे दोन दिवस काम थांबविण्यात आले होते. अखेर सोमवारपासून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला असून रेल्वे मार्गादरम्यान खचलेला रस्ता खोदण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असून पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत रस्ता बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे खात्याच्या अधिकाऱयांनी दिली.