रशियाच्या वोरकुता शहरातील अवघड स्थिती
रिकाम्या पडलेल्या इमारतींमध्ये केवळ बर्फच बर्फ
रशियाचे शहर वोरकुतापासून 17 किलोमीटर अंतरावरील एक नागरी वस्तीचा भाग सध्या जणूच गोठलाच गेला आहे. तेथे हिवाळय़ात पारा उणे 50 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जातो. याचमुळे हा भाग 2013 पासून निर्जन झाला असून असहय़ थंडीमुळे लोकांनी तेथून स्थलांतर केले आहे. तेथील रिकामी इमारतींमधील कोपरा न कोपरा बर्फाने आच्छादला गेला आहे. रस्त्यांवर उभी असलेल्या वाहनांवरही बर्फाचा मोठा थर जमा झाला आहे.
रशियाच्या वोरकुतापासून काही किलोमीटर अंतरावर वसलेला हा भाग युरोपच्या सर्वात थंड भागांमध्ये सामील आहे. हिवाळय़ाची तीव्रता अधिक असल्याने प्रत्येक गोष्ट गोठून गेली आहे. येथे एकेकाळी 70 हजारांपेक्षा अधिक लोक राहायचे. पण तीव्र हिवाळय़ामुळे हा परिसर आता निर्जन झाला आहे. या भागात रशियाचा क्रूर हुकुमशहा स्टॅलिनने कैद्यांना ठेवण्यासाठी गुलाग तुरुंगही तयार केला होता. शहराच्या मोकळय़ा पडलेल्या इमारतींमधील स्थितीही भयावह आहे.
थंडीमुळे या घरांमधील स्थिती अत्यंत खराब झाली आहे. खिडक्या बर्फामुळे दिसूनच येत नाहीत. ड्रॉइंग रुममध्ये फर्निचरपासून झुंबरपर्यंत सर्वत्र बर्फाचेच अधिराज्य दिसून येते. खोल्यांपासून स्वयंपाकघराच्या खिडक्यांपर्यंत सर्वत्र बर्फ जमा झाल्याने हवा खेळती राहण्याचा मार्गच बंद झाला आहे. जिन्यापासून रेलिंगपर्यंत सर्वत्र बर्फच जमा झाला आहे.
अन् अवकळा आली
1932 च्या आसपास या शहराला कोळसा उत्खननाचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जायचे. पण सोव्हिएत संघाचे पतन तसेच 15 तुकडे झाल्यावर या क्षेत्रातला अवकळा आली. कोळसा खाणींमध्ये काम करणाऱया मजुरांना अधिक रकमेचे आमिष दाखविण्यात आल्यावरही ते काम करण्यास तयार झाले नव्हेत. उत्तर आर्क्टिक क्षेत्रातील हे चौथे सर्वात मोठे शहर आहे. युरोपमध्ये सर्वाधिक थंडी याच भागात पडते.