टॉमेटो सॉसला आकारणी केली म्हणून परप्रांतियाचे कृत्य
प्रतिनिधी /मडगाव
टॉमेटो सॉससाठी रक्कम आकारली म्हणून उतोर्डा येथे पिटर मोराईस याच्या डोक्यावर चॉपरने वार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या मूळ राजस्थान राज्यातील व सध्या बाणावली गावात राहात असलेल्या भारत बिस्त या 38 वर्षीय संशयित आरोपीला न्यायालयाने अनेक अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
खुनी हल्याची ही घटना उतोर्डा येथील ‘भारत फास्ट फूड’ या जागी घडली होती. या संशयित आरोपीला वेर्णा पोलिसांनी 7 डिसेंबर 2021 रोजी भारतीय दंड संहितेच्या 307 कलमाखाली अटक केली होती. अटक केल्यानंतर अनेक दिवस आरोपी वेर्णा पोलीस स्थानकातील पोलीस कोठडीत होता. या अवघीत पोलीस या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपास पूर्ण करु शकले असते अशी टिपण्णी करुन अतिरिक्त सत्र न्यायाधीश चोलू गावस यांच्या न्यायालयाने वरील संशयित आरोपीला अटी घालून जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.
50 हजार रुपयांचा बॉण्ड व तितक्याच रकमेचा हमीदार सादर करावा, तपास यंत्रणेला सहकार्य करावे आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता कामा नये अशी अट न्यायालयाने घातलेली आहे.