प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा हा ऐतिहासिक वैभव लाभलेला जिल्हा. क्रांतीकारकांच्या शौर्यगाथा अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवणारा जिल्हा. कोणतीही गोष्ट करायची ती मनापासून अन चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करत साऱया जगाला त्याचे अनुकरण लावण्याचाही चांगला सातारच्या मातीत आहे. मॅरेथॉन नंतर आता साताऱयात सायकलथॉनची जोरदार क्रेझ निर्माण होत आहे. चांगल्या आरोग्यासाठी सायकल चालवणे खूप फायदेशीर आहे असा संदेश प्रत्यक्ष दररोज सायकल चालवून व लांब अंतराच्या रायडिंग करुन देणाऱया सायकलपट्टूंचा नुकताच साताऱयात गौरव करण्यात आला.
साताऱयातील क्रीडा क्षेत्रातील गोष्टींना तन, मन, धनाने सातत्याने पाठिंबा देणाऱया खिलाडूवृत्तीच्या कनय्यालाल पुरोहित यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आरोग्यासाठी व पॅशन म्हणून सायकलिंग करणाऱया आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह नुकतेच सातारा-लोणावळा-सातारा अशी 400 कि. मी. ची सायकल रायडिंग यशस्वीपणे पूर्ण केलेल्या नागठाणेचा प्रतिक नलवडे, साताऱयातील विवेक देशमुख, विनय नाईक, सायलकवरुन भारतभ्रमण पूर्ण केलेला सायकलपट्टू तुषार भोईटे, धनंजय जगताप , आयर्नमॅन हेमल उपाध्याय, सायकल चालवणे शारीरीक तंदुरुस्तीसाठी किती फायदेशीर हे सिध्द करत सर्वांना सायकल चालवण्याचा संदेश देणारे बालाजी मोबाईलचे संतोष शेडगे, डॉ. थोरात यांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
गेल्या काही वर्षांपासून जिल्हय़ात सायकलिंग करणाऱयांची संख्या वाढलीय. Marathon धावताना पायांची व गुडग्यातील हाडांची झीज होते. त्यातून त्यासंदर्भातील आजार वाढतात हे डॉक्टर्स मंडळी देखील सांगत आहेत. मग शरीरही फिट राहिले पाहिजे अन हाडांची झीज टळून पायाचे प्रॉब्लेमही निर्माण न होण्यासाठी सायकलिंग केल्यास पायांच्या, गुडग्यांच्या स्नायूंना बळकटी येते. सायकलिंग हा व्यायाम चांगला फायदेशीर ठरत असल्याने आता साताऱयात सायकल संस्कृती रुजवण्याचा संकल्प या कार्यक्रमात करण्यात आला.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह सायकलिंगमध्ये आयकॉन ठरलेल्या सर्व सायकलपट्टूंनी देखील यावेळी साताऱयात सायकल संस्कृती रुजवण्यासाठी तसेच प्रत्येक घराघरात सर्वांकडून सायकलचा वापर होण्यासाठी जनजागृती करण्याचा मनोदय व्यक्त केला.
सायकल चालवा फिट्ट रहा
राजकीय, सामाजिक जीवनात मी काम करत असताना धावपळ, ताणतणावांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मलाही काही महिन्यांपूर्वी त्रास झाला तो सर्वांना ज्ञात आहे. मात्र, आजारमुक्त जीवन जगण्यासाठी मी सायकलिंग सुरु केले. आज देखील मी करत आहे व करत राहीन. साताऱयातील प्रत्येकाने सायकलचा वापर सुरु केला पाहिजे. सातारा शहरात सर्वांनी तंदुरुस्त रहावे यासाठी सायकलिंग केल्यास किंवा सायकलचा वापर केला तरी आरोग्याच्या समस्यातून सुटका होईल. कनैय्यालाल पुरोहित मित्रपरिवाराने सायकल संस्कृती रुजवण्याच्या प्रयत्नात मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी भावना यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केली.
कमी खर्चाचा प्रदुषणमुक्त व्यायामप्रकार
मी बास्केटबॉल खेळत होतो. मात्र खूप काळ खेळत राहिल्याने हाडांची झीज झाल्यावर जो त्रास होतो तो मी अनुभवला. माझ्या काही मित्रांनाही त्याचा त्रास झाल्यावर हाडतज्ञ मान्यवर डॉक्टर्संनी सायकलिंगचा सुरु करण्यास सांगितले. सायकलिंगमुळे पायांच्या स्नायूची ताकद चांगल्या प्रकारे वाढते व सर्व शरीराला आवश्यक व्यायाम मिळून आरोग्य सदृढ राहते. साताऱयातील खूप युवक, नागरिक आता सायकलिंग करत आहेत. त्यांचे कौतुक करुन त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी सायकलपट्टूंचा गौरव करण्याचा उपक्रम आम्ही राबवला. यापुढे देखील साताऱयातील सायकलप्रेमींच्या सहकार्याने सातारा सायकलचे शहर ही नवीन ओळख करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे कनैय्यालाल पुरोहित यांनी सांगितले.
सायकल संस्कृती रुजवण्यासाठी पुढाकार घ्या
सध्या सातारकर युवकांसाठी दररोज सायकलिंग करणारे आमदार शिवेंद्रराजे भोसले आयकॉन ठरलेले आहेत. अगदी 1400 रुपयांची सायकल विकत घेवून हा व्यायामप्रकार सुरु करता येतो. सायकलिंगमुळे मिळणारी शारीरीक तंदुरुस्ती सर्वांना मिळवून देण्यासाठी आम्ही भविष्यात आणखी उपक्रम राबवणार आहोत. वास्तविक सायकल चालवणे कमीपणाचे समजण्याचे काहीच कारण नाही. मध्यमवर्गीयच नव्हे तर कोणत्याही स्तरातील कॉलेज युवकांनी कॉलेजवर जाताना सायकल वापरल्यास त्याचा तंदुरुस्तीसाठी उपयोग होईल व शहरातील प्रदुषण देखील कमी होईल. त्यासाठी सायकलिंग संस्कृती रुजवण्यासाठी प्रत्येक सातारकरांने आता पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन संतोष शेडगे यांनी केले.
होय आम्ही 401 कि. मी. सायकल रायडिंग केले
मी व माझे मित्र विवेक देशमुख व विनय नाईक दररोज सायकलिंग करतोय. एक वेगळा शारीरीक तंदुरुस्तीचा अनुभव आम्ही घेत आहोत. एक दिवस अचानक लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि साताऱयातील बाँबे रेस्टारंटपासून ते लोणावळा व लोणावळा ते पुन्हा बाँबे रेस्टारंट असे 401 कि. मी. अंतराचे सायकलिंग आम्ही कोणत्याही त्रासाविना यशस्वीपणे पूर्ण केले. ते केल्यानंतर जी शारीरीक, आंतरीक उर्जा आम्हाला मिळाली ती अनुभवण्यात मजा आहे. त्यामुळेच सर्वांनी सायकलिंग प्रकाराकडे वळत सायकलचा वापर केला पाहिजे, असे प्रतिक नलवडे यांनी सांगितले.