हाथरसच्या सीमा बंद : छावणीत रुपांतरित झाले मृत युवतीचे गाव
वृत्तसंस्था/ हाथरस
उत्तरप्रदेशच्या हाथरस जिल्हय़ातील सामूहिक बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यावर तिच्या गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. बलात्कार पीडित असलेल्या दलित युवतीचा दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 4 ही आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याने गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होणार असल्याचे हाथरस जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
14 सप्टेंबर रोजी संबंधित युवतीवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणातील आरोपी संदीपला 19 रोजी अटक करण्यात आली होती. सामूहिक बलात्कारानंतर पीडितेची जीभ कापण्यात आली होती. गंभीर प्रकृती झालेल्या पीडितेला 28 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
हाथरसमधील तणाव पाहता गावानजीकच्या परिसराला छावणीत रुपांतरित करण्यात आले आहे. गावातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हय़ात राजकीय नेत्यांचा प्रवेश रोखण्यात आला आहे. जिल्हय़ाच्या सर्व सीमा पोलिसांनी बंद केल्या आहेत. प्रशासनाकडून मृत युवतीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
14 रोजी चंदपा भागातील एका गावात 19 वर्षीय युवतीवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. संबंधित आरोपींनी तिची जीभ कापली होती. तसेच तिच्या कण्याचे हाड मोडले होते.