बाराबंकी येथे बस ट्रकला धडकली
बाराबंकी : उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये गुरुवारी बस आणि ट्रक यांच्या धडकेत 14 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. ही बस दिल्लीहून बहराइच येथे जात होती आणि यात 60-70 प्रवासी होते. बबुरी गावानजीक पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत 12 पुरुष, एक महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. भरधाव बससमोर अचानक गाय आल्याने ही दुर्घटना घडली आहे. गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक आणि बसची टक्कर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. टक्कर अत्यंत तीव्र असल्याने दोन्ही वाहनांचे छतच उडून गेले आहे. जेसीबीच्या मदतीने बस आणि ट्रकला वेगळे करण्यात आले. अनेक मृतदेह आणि प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. 14 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.