पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीस प्रारंभ
@ लखनौ / वृत्तसंस्था
उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आजपासून (गुरुवार) प्रारंभ होत आहे. उत्तर प्रदेशात प्रथम टप्प्यात 11 जिल्हय़ांमधील 58 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार आपला मताधिकार उपयोगात आणणार आहेत.
या 58 मतदारसंघांमध्ये एकंदर 623 उमेदवार स्पर्धेत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या. या टप्प्यात जाट मतदारांचे प्राबल्य असल्याने येथे मतदानाचा कल कसा राहतो, याकडे राजकीय पक्षांसह राजकीय तज्ञांचेही लक्ष लागून राहिले आहे.
या टप्प्यात अनेक महत्वाचे मतदारसंघ असून तेथे उत्कंठावर्धक संघर्ष होत आहेत. मतदानाच्या प्रमाणावर बरेच काही अवलंबून आहे, असे तज्ञांचे मत आहे. कोरोना नियम आणि हवामान अशा घटकांवर मतदानाचे प्रमाण अवलंबून राहण्याची शक्यता आहे. महिला मतदारही महत्वाची भूमिका बजावणार आहेत. शेतकरी आंदोलनाचा किती प्रभाव जाणवतो याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
नोयडा मतदारसंघ ः हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ असून येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचे पुत्र पंकज सिंग पुन्हा उभे आहेत. हा मतदारसंघ गौतम बुद्ध नगर जिल्हय़ातील आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत येथे पंकज सिंग यांनी सपचे सुनिल चौधरी यांचा 1,04,016 मतांनी पराभव केला होता.
कैराणा मतदारसंघ ः शामली जिल्हय़ातील हा मतदारसंघ कैराणा या लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. ही जागा 1996 पासून भाजपच्या हुकुम सिंग यांनी जिंकली आहे. मात्र, 2014 मध्ये ते लोकसभेचे सदस्य झाल्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हुकुमसिंग यांच्या कन्या मृगांका सिंग यांचा येथे पराभव झाला होता. समाजवादी पक्षाच्या काळात येथून हिंदूंना पलायन करावे लागले होते असा भाजपचा आरोप आहे. यावेळी येथे चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे.
ठाना भवन मतदारसंघ ः उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि मंत्री सुरेश कुमार येथून गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत. यंदा त्यांच्या विरोधात रालोदचे अश्रफ अली यांना उतरविण्यात आले आहे. 2017 च्या निवडणुकीत सुरेश कुमार यांनी बसपचे अब्दुल वारीस यांना 16,817 मतांनी हरविले होते.
आग्रा (ग्रामीण) मतदारसंघ ः भाजपने येथून उत्तराखंडच्या माजी राज्यपाल बेबीरानी मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. त्या 1995 ते 2000 या कालखंडात आग्रा शहराच्या महापौर होत्या. 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या हेमलता दिवाकर यांनी ही जागा सहजगत्या मोठय़ा अंतराने जिंकली होती.
मुझ्झफ्फरनगर ः सध्या हा मतदारसंघ भाजपचे कपिल देव अग्रवाल यांच्याकडे असून ते उत्तर प्रदेशचे मंत्री आहेत. ते 2015 पासून येथील आमदार आहेत. त्यांच्या विरोधात रालोदने सौरभ यांना उमेदवारी दिली आहे. अग्रवाल यांनी आतापर्यंत ही जागा कमी अंतराने जिंकली आहे. यावेळी अधिक चुरस आहे.
मथुरा ः येथून भाजपने विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री श्रीकांत शर्मा यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदीप माथुर आहेत. 2017 च्या निवडणुकीत शर्मा 1,01,161 मतांच्या आधिक्क्याने विजयी झाले होते. माथुर 2002 ते 2017 पर्यंत येथील आमदार होते.
सरधाना मतदारसंघ ः हा मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा आहे. संगीत सोम हे येथील आमदार आहेत. त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात सपने अतुल प्रधान यांना उतरविले आहे. सोम यांनी 2012 आणि 2017 अशा दोन विधानसभा निवडणुकांमध्ये येथून विजय मिळविला आहे.