ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात दोन साधूंची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जगनदास (वय ५५) आणि सेवादास (३५) अशी या दोन साधूंची नावे असून, हे दोघेही बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावातील शिवमंदिरात मागील १० वर्षांपासून राहत होते. हे दोघेही मंदिरात दररोज पूजाअर्चा करत. सोमवारी रात्री उशिरा अज्ञातांनी त्यांची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. आज सकाळी लोक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
दोन्ही साधूंना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांनी गावातील एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.