अपना दलचा आमदार बसपमध्ये सामील
विधानसभा निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशात राजकीय वातावरण तापलेले असताना सत्तारुढ रालोआला झटका बसला आहे. सोनभद्रच्या दुद्धीचे आमदार आणि अपना दल (एस)चे नेत हरिराम चेरो यांनी बसपमध्ये प्रवेश केला आहे. बसप जिल्हाध्यक्ष कमलेश गोंड यांनी हरिराम यांना बसपचे सदस्यत्व प्रदान केले आहे.
हरिराम चेरो आता दुद्धीमधून बसपच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असल्याचे मानले जातेय. निवडणुकीपूर्वी अपना दल (एस)च्या आमदाराने पक्ष सोडल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा मतदारसंघांच्या संख्येनुसार दुद्धी (403) हा राज्याचा अंतिम मतदारसंघ आहे.
दरवेळेप्रमाणे यंदाही येथील राजकयी वातावरण तापलेले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव या मतदारसंघात 2017 च्या निवडणुकीत अपना दल उमेदवार हरिराम चेरो यांनी 7 वेळा आमदार राहिलेले विजय सिंह गोंड यांचा केवळ 1,085 मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपला कधीच विजय मिळविता आलेला नाही.
मागील निवडणुकीत विजयी झालेले हरिराम चेरो हे भाजपच्या आघाडीत सामील अपना दल (एस)चे उमेदवार होते. यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय सिंह गोंड यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी खासदार दिवंगत रामप्यारे पनिका यांच्या पत्नी वसंती पनिका यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. भाजप आणि बसपने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही.