अयोध्या, नेपाळ सीमेवरील सतर्कता वाढली : इस्लामिक स्टेटचे दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात इस्लामिक स्टेटचे दोन दहशतवादी घुसल्याचे समोर आल्यावर कुशीनगर-महाराजगंज जिल्हय़ांसमवेत नेपाळ सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. बस्ती विभागाचे पोलीस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांनी रविवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
अब्दुल समद आणि ख्वाजा मोइनुद्दीन हे दोन दहशतवादी उत्तरप्रदेशात दाखल झाले आहेत. दोन्ही दहशतवादी सिद्धार्थनगर, कुशीनगर आणि महाराजगंजच्या मार्गे नेपाळमध्ये पलायन करू शकतात. बस्ती विभागात सतर्कता वाढविण्यात आली असून अयोध्येतही पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा दक्ष आहेत. वाहनांची तपासणी केली जात असल्याचे कुमार यांनी सांगितले
आहे.
छायाचित्रे प्रसारित
फैजाबाद पोलिसांना दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे पाठविण्यात आली आहेत. राम मंदिरासंबंधी निर्णय दिला गेल्यावर अयोध्येवरील दहशतवाद्यांचा धोका वाढला आहे. अयोध्येत प्रवेश करणाऱया वाहनांची तपासणी केली जात आहे.
2017 मध्ये अटक
अब्दुल आणि मोईनुद्दीन यांना 16 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पाहिले गेले होते. सीरियातून परतल्यावर दोन्ही दहशतवाद्यांनी दक्षिण भारतासह अन्य राज्यांमधील तरुणाईचे ब्रेनवॉश करत त्यांना इस्लामिक स्टेटशी जोडत होते. दोघेही इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्याही संपर्कात आहेत. मोईनुद्दीनला सप्टेंबर 2017 मध्ये एनआयएने चेन्नई येथून ताब्यात घेतले होते. फेब्रुवारी 2018 मध्ये समद पकडला गेला होता. समदने पुणे स्फोटात हात असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सदस्याला हवालाच्या माध्यमातून रक्कम पोहोचविली
होती.
नेपाळ सीमेवर दक्षता
दहशतवादी शिरल्याची माहिती समोर येताच नेपाळला लागून असलेल्या सिद्धार्थनगर, कुशीनगर, महाराजगंज, गोरखपूर आणि देवीपाटन, बहराइच आणि बस्ती क्षेत्रात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची छायाचित्रे एसएसबी आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहेत. गुप्तचर यंत्रणा देखील नेपाळ सीमेवर या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.