ऑनलाईन टीम / गाझियाबाद :
उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील मुरादनगरस्मशानभूमीच्या गॅलरीचे छत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
मुरादनगरच्या डिफेन्स कॉलनीतील रहिवासी फळ विक्रेते जयराम (वय ६५) यांच्या अंत्यविधीला हे सर्व लोक आले होते. अंत्यसंस्कारानंतर गेटच्या शेजारच्या गॅलरीत मौन पाळण्यासाठी हे सर्व लोक जमले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. ही गॅलरी अडीच महिन्यांपूर्वी बांधण्यात आल्याचे वृत्त आहे. बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले असल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.