ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील 69 हजार पदांच्या शिक्षक भरती प्रक्रियेतील 31,277 शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या शिक्षकांना 16 ऑक्टोबरला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
दरम्यान, या सहाय्यक शिक्षकभरतीवरून अनेक वाद निर्माण झाले होते. अर्ज भरताना चुका केलेल्या काही उमेदवारांनी हायकोर्टात स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या. शिक्षक भरतीच्या अर्जात चुका करणाऱ्या उमेदवारांना दिलासा देत उच्च न्यायालयाने मूलभूत शिक्षण परिषदेला नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधित्वाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या याचिकांवर न्यायमूर्ती पंकज भाटिया यांनी सुनावणी घेतली होती.
न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षक भरतीच्या यादीला दुजोरा देताना उत्तर प्रदेशचे शिक्षणमंत्री सतीश द्विवेदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 31,277 शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांची भरती प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्वरित भरती केली जाईल.