मायावती यांच्याकडून घोषणा – एआयएमआयएमशी आघाडी नाही
वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा रविवारी केली आहे. पण पंजाबमध्ये आघाडीची शक्यता कायम राहणार आहे. उत्तरप्रदेशात बसप आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांच्यात आघाडी होणार असल्याच्या वृत्ताला मायावती यांनी खोडून काढले आहे.
उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक एआयएमआयएम आणि बसप मिळून लढणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसारित करण्यात येत आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे तसेच भ्रम पसरविणारे आहे. बसप मीडिया विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी सतीश चंद्र मिश्र यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मायावती यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
बहुजन समाज पक्षासंबंधी बातम्या लिहिण्यापूर्वी, दाखविण्यापूर्वी किंवा छापण्यापूर्वी सतीशचंद्र मिश्र यांच्याकडून योग्य माहिती अवश्य घ्या, पक्षाची बाजू मांडणे आवश्यक असल्याचे आवाहन मायावती यांनी प्रसारमाध्यमांना केले आहे.
उत्तरप्रदेशात 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान बसप आणि सप यांनी स्वतःचे जुने वैर बाजूला ठेवून आघाडी केली होती. पण निवडणुकीत पराभव झाल्यावर मायावती यांनी याकरता समाजवादी पक्षाच्या कमकुवत संघटनेला जबाबदार ठरविले होते. त्यानंतर दोन्ही पक्षाची आघाडीही संपुष्टात आली होती. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसप आणि ओवैसी यांच्या एआयएमआयएमने आघाडी केली होती.