सायकलवर स्वार होणार इम्रान मसूद : राहुल गांधी अन् प्रियंका वड्रा यांचे निकटवर्तीय
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. राज्यात जवळपास अस्तित्वहीन ठरू लागलेल्या काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकटी मिळवून देऊ पाहणाऱया प्रियंका वड्रा यांना मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांचे निकटवर्तीय काँग्रेस नेते इम्रान मसूद हे समाजवादी पक्षात सामील होणार आहेत. तर त्यांचे बंधू नोमान मसूद यांनी बहुजन समाज पक्षात सामील होणार असल्याचे जाहीर केले आहे.
सहारनपूर जिल्हय़ाशी संबंधित काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव इम्रान मसूद हे स्वतःच्या विधानांमुळे चर्चेत राहतात. काँग्रेससोबतचे सर्व संबंध तोडून समाजवादी पक्षात घरवापसी करणार असल्याचे मसूद यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेसकरता प्रियंका वड्रा प्रचंड मेहनत करत आहेत ही बाब खरी आहे. परंतु वर्तमान राजकीय स्थिती पाहता आम्हाला समाजवादी पक्षाला साथ द्यावी लागणार आहे. प्रियांका आणि राहुल गांधी यांचा मी ऋणी आहे. भाजपला पराभूत करणाऱया विचारसरणीलाच समर्थन करणार असल्याचे पूर्वीच स्पष्ट केले होते. अखिलेश यादव हेच भाजपला आव्हान देत असल्याने त्यांना समर्थन देणार असल्याचे ते म्हणाले.
पक्षांतर महत्त्वपूर्ण
निवडणुकीच्या काळात पक्षांतर होणे सामान्य बाब असली तरीही काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव इम्रान मसूद यांनी दुसरा झेंडा हाती घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 2014 मध्ये सहारनपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राघव लखनपाल शर्मा विजयी झाले असले तरीही इम्रान यांनी 4 लाख मते मिळविली होती.
2 आमदारांना नेणार सोबत
2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सहारनपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणारे मसूद तिसऱया क्रमांकावर फेकले गेले होते. 2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत नकुड मतदारसंघात इम्रान यांना डॉ. धर्मसिंह सैनी यांनी पराभूत केले होते. इम्रान हे स्वतःसोबत दोन आमदार मसूद अख्तर तसेच नरेश सैनी यांना सपमध्ये नेणार असल्याची चर्चा आहे.
आझम यांच्याजागी नवा चेहरा
समाजवादी पक्ष दिग्गज नेते आझम खान यांच्या अनुपस्थितीत निवडणूक लढविणार आहे. यामुळे समाजवादी पक्षाला मोठय़ा मुस्लीम नेत्याचा शोध होता. इम्रान मसूद हे आझम खान यांच्या तोडीचे नेते नसले तरीही पश्चिम उत्तरप्रदेशच्या अनेक मतदारसंघांमध्ये त्यांचा चांगलाच प्रभाव आहे.
जाट-मुस्लीम समीकरण
पश्चिम उत्तरप्रदेशच्या 26 जिल्हय़ांमध्ये 136 विधानसभा मतदारसंघ येतात. यात मेरठ, सहारनपूर, मुरादाबाद, बरेली, आगरा समवेत अनेक जिल्हय़ांचा समावेश होतो. पश्चिम उत्तरप्रदेशात 20 टक्के जाट तर 30-40 मुस्लीम आहेत. हे दोन्ही समुदाय एकत्र आल्यास सुमारे 50 हून अधिक मतदारसंघांमध्ये विजय निश्चित होतो. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 136 पैकी 109 मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. तर सपला 20 ठिकाणी यश मिळाले होते. भाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी समाजवादी पक्षाने पूर्वीच रालोदसोबत आघाडी केली आहे.
पंजाबच्या नेत्यांची डेरा सच्चा सौदाच्या दिशेने धाव
वाद एका बाजूला आणि राजकारण दुसऱया बाजूला. पंजाबमधील राजकीय नेते सध्या स्वतःचे राजकारण चमकविण्यासाठी ‘डेरा सच्चा सौदा’च्या दिशेने धाव घेऊ लागले आहेत. या नेत्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. राज्यातील निवडणुकांची घोषणा होताच सुमारे 10-12 नेते, मंत्री, संभाव्य उमेदवार हे बाबा गुरमीत राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये जाऊन आले आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्याच्या दुसऱयाच दिवशी भाजपचे हरजीत ग्रेवाल आणि सुरजीत ग्यानी हे डेरा सच्चा सौदामध्ये पोहोचले. तर काँग्रेसचे विजय इंदर सिंगला (मंत्री), साधू सिंह धरमसोत, हरमिंदर जस्सी आणि मंगत राय बन्सल यांनीही तेथे हजेरी लावली आहे. आम आदमी पक्षाचे भटिंडा शहर मतदारसंघाचे उमेदवार जगरुप गिल आणि अकाली दलाचे उमेदवार दिरबा गुलजार सिह यांनीही डेरा सच्चा सौदामध्ये धाव घेतली आहे.
हे सर्व नेते डेरामध्ये रविवारी झालेल्या सत्संगमध्ये सामील झाले होते असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदाकडून देखील याप्रकरणी कुठलीच टिप्पणी समोर आलेली नाही. या सत्संगमध्ये डेराच्या राजकीय विषयक समितीचे राम सिंह आणि राज्य समितीचे सदस्य देखील उपस्थित होते. डेराकडून जाहीरपणे स्वतःच्या अनुयायांना एखाद्या पक्षाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात आवाहन केले जाते. डेरा सच्चा सौदाच्या पंजाबमध्ये सुमारे 84 शाखा आहेत. यातील 11 शाखा केवळ भटिंडा जिल्हय़ामध्ये आहेत. पंजाबच्या मालवा क्षेत्रातील 40 हून अधिक मतदारसंघांमध्ये डेरा सच्चा सौदा आणि त्याच्या समर्थकांचा प्रभाव आहे.