प्रतिनिधी/ पणजी
उत्तरप्रदेश सरकार इतके निर्दयी, क्रूर आहेत की बलात्कारानंतर त्या पीडीत मुलीचे शरीर जाळण्यात आले. कुटुंबियांना त्या पीडीत मुलीचा चेहराही पाहायला देण्यात आला नाही. सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावतात. परंतु बेटी का बलात्कार करो और उसे जलाओ हा त्यांचा मुख्य हेतू आहे. उत्तरप्रदेश सरकारने मुलींवर होणारी छळणूक थांबवावी अशी मागणी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या सोशल मीडीयाच्या प्रमुख रोशनी डिसील्वा यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी गोवा महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हाथरस बलात्कार पीडीत मुलीची बाजू मांडण्यासाठी पाठविण्यात येणाऱया पोस्टकार्डचे अनावरण करण्यात आले. महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव यांनी सदर पोस्टकार्डचे उद्घाटन केले असून सदर मोहिम संपूर्ण देशभरात सुरू राहणार आहे. उत्तरप्रदेश सरकार पीडीतेला आधार देण्याऐवजी त्यांना दोष देत आहेत. असा आरोप रोशनी यांनी यावेळी केला.