राज्यातील राजकीय घडामोडींना वेग
वृत्तसंस्था / देहरादून
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दोन निरीक्षकांना पाठविल्यावर उत्तराखंडमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उत्तराखंड भाजपमध्ये दीर्घकाळापासून मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्यावरून नाराजीची चर्चा होत आहे. राष्ट्रीय पातळीवरून पाठविण्यात आलेले निरीक्षक आता उत्तराखंडमधील स्थितीचा आढावा घेत असून स्वतःचा अहवाल पक्षनेतृत्वाला सोपविणार आहेत. त्यानंतरच उत्तराखंडमध्ये निवडणुकीपूर्वी मोठा बदल होणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
उत्तराखंडमधील भाजपच्या अनेक आमदारांनी काही महिन्यांपूर्वी दिल्लीत येत भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांची भेट घेतली होती. सद्यस्थितीत निवडणूक झाली तर भाजपच्या अडचणी वाढू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. अनेक आमदारांनी उघडपणे अधिकारी काम करत नसल्याची तक्रार करत निवडणुकीत जनतेसमोर कसे जायचे अशी विचारणा केली होती.
भाजपच्या अडचणी वाढणार
उत्तराखंड भाजपमधील अनेक नेत्यांनी पक्षनेतृत्वासमोर बदल न केल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात, याचा लाभ काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेल्यास अडचणीत येणार असल्याचे भाजपच्या एका पदाधिकाऱयाने म्हटले आहे.
पुढील वर्षी निवडणूक
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षाच्या प्रारंभी निवडणूक होणार आहे. यंदा दिल्लीत सत्तारुढ असलेल्या आम आदमी पक्षाने उत्तराखंडची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजप सरकारला सत्ताविरोधी भावनेला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच पक्षात सुरू असलेली चढाओढही आव्हान ठरण्याची शक्यता आहे.