17 मे रोजी केदारनाथच्या दर्शनास सुरुवात
केदारनाथ : उत्तराखंडच्या चारधामांपैकी एक आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथ धामचे दर्शन 17 मे रोजी पहाटे 5 वाजता सुरू होणार आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिनी केदारनाथच्या दर्शनाची तारीख निश्चित करण्यात येते. उत्तराखंडातील तीन अन्य धाम बद्रीनाथचे दर्शन 18 मे रोजी आणि गंगोत्री-यमुनोत्रीचे दर्शन अक्षय तृतीयेला (14 मे) सुरू होणार आहे. उत्तराखंड चारधाम देवस्थानम बोर्डाचे माध्यम प्रभारी डॉ. हरीश गौड यांच्यानुसार 14 मे रोजी केदारनाथची पालखी ओंकारेश्वर मंदिर उखीमठपासून केदारनाथ धामच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. 14 मे रोजी फाटा, 15 मे रोजी गौरीकुंड, 16 मे रोजी संध्याकाळी पालखी केदारनाथ धाममध्ये पोहोचणार आहे. 17 मे रोजी सकाळी मंदिरात दर्शन सुरू केले जाणार आहे. हिवाळय़ात उत्तराखंडमधील चारही धामांच्या ठिकाणी कमालीची थंडी असते, वेळोवेळी हिमवृष्टी होत राहते. हवामान प्रतिकूल असल्याने दरवर्षी हिवाळय़ात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे भाविकांना दर्शन घेता येत नाही.