ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशी संवाद साधला. रावत यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे मोदींनी आश्वासन दिले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशी संवाद साधला आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या काही तुकड्या दिल्लीहून विमानाने उत्तराखंडला पाठवल्या जात असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटले आहे की, उत्तराखंडमधील परिस्थितीवर मी सतत लक्ष ठेवून आहे. संपूर्ण देश उत्तराखंडच्या पाठीशी उभा आहे आणि देश सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने बोलत आहे आणि एनडीआरएफच्या तैनाती, बचाव आणि मदत कार्याची माहिती घेत आहे.