ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात रविवारी कोरोनाच्या 43 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2344 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये अल्मोडा आणि उत्तरकाशीमध्ये प्रत्येकी एक, चमोलीमध्ये नऊ, हरिद्वारमध्ये बारा, देहरादूनमध्ये सहा, टिहरीमध्ये सहा, रुद्र प्रयाग आणि पौडीमध्ये प्रत्येकी चार जणांचा सहभाग आहे.
उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 1486 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 796 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, उत्तरखंडमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील या महामारी ने घेतले आहे. आतापर्यंत 60 पेक्षा अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या संकटाच्या काळात चोवीस तास रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. असेही पंत यांनी यावेळी सांगितले.