ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. उत्तराखंडात गुरुवारी कोरोनाचे 37 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2984 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव युगल किशोर पंत यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, काल आढळलेल्या रुग्णांमध्ये पौडी, पिथौरागड, अल्मोडा आणि देहरादूनमध्ये प्रत्येकी एक, नैनिताल 17 आणि ऊधमसिंह नगरमधील 16 जणांचा समावेश आहे. गुरुवारी 88 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
दरम्यान, उत्तराखंड राज्यात आतापर्यंत 2405 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 510 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, असे पंत यांनी यावेळी स्पष्ट केले.