उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी स्वतःचे दृष्टी पत्र जारी केले. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याहस्ते हे दृष्टी पत्र सादर करण्यात आले. या दृष्टी पत्रात कठोर भूमी कायदा आणण्याचे आणि हिम प्रहरी निर्माण करण्याचे आश्वासन सामील आहे.
दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांच्या नावाने माजी सैनिकांसाठी पतहमी निधी निर्माण केला जाणार आहे. शेतकऱयांना दरवर्षी 6 हजार रुपये देण्यासह सेंद्रीय शेती मोहीम हाती घेण्यात येईल. 3500 गावांसाठी विशेष योजना, कुमाऊंमध्ये मानस मंदिर मिशन अंतर्गत मंदिरांना विकसित करण्यात येणार आहे. हरिद्वारमध्ये मिशन मायापुरी सुरू होईल. गरीब महिलांना वर्षात तीन मोफत सिलिंडर, बीपीएल कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 3 हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपकडून नमूद करण्यात आले आहे.
महिला स्वयंसहाय्य गटांसाठी 500 कोटींचा निधी देण्यात येईल. 400 जनौषधी केंद्रे, राज्यात रोपवेची साखळी विकसित करण्यात येईल. मैदानी क्षेत्रांमध्ये विद्यार्थिनींना सायकल, पर्वतीय क्षेत्रांमध्ये सायकलसाठी पैसे देण्यात येणार आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांना 6 हजार रुपयापर्यंतचे पेन्शन, 5 लाखांचा विमा देण्याचे आश्वासन भाजपने दृष्टीपत्रात सामील केले आहे.
राज्यात लव्हजिहाद विरोधी कायदा अधिक कठोर करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. महिला पोलीस स्थानकांची संख्या दुप्पट केली जाईल. उधमसिंह नगर आणि हरिद्वारमध्ये नवी सशस्त्र पोलीस बटालियन निर्माण करण्याचे आश्वासन नमूद आहे.