सभेदरम्यान विरोधकांना मोदींनी केले लक्ष्य
वृत्तसंस्था /हल्दानी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उत्तराखंडच्या हल्दानी येथे 17,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 6 प्रकल्पांचे उद्घाटन आणि 17 प्रकल्पांच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. हल्दानी शहराच्या विकासासाठी सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या योजना लागू केल्या जात असल्याचे म्हणत पंतप्रधानांनी सभेत विरोधकांना लक्ष्य केले आहे.
विरोधकांनी यापूर्वी राज्यातील जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले. उत्तराखंडला सुविधांपासून दूर ठेवा आणि राज्य करा, अशी मानसिकता यापूर्वीच्या सत्ताधाऱयांची होती. जनतेने नाकारल्याने आता त्यांनी अफवा पसरविण्याचे दुकान उघडले असल्याची टीका मोदींनी केली आहे.
पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी प्रकल्प ताटकळत ठेवल्याने उत्तराखंडचे नुकसान झाले. अशाप्रकारचे पाप करणाऱयांना जनता विसरणार नाही. मी योग्य काम करतोय, लोकांनी आता विरोधकांना ठीक करावे. पूर्वी सत्तेवर असलेल्यांना लोकांची चिंता असती तर प्रकल्प 4 दशकांपर्यंत रखडले नसते. त्यांनी उत्तराखंडच्या सामर्थ्याची कधीच पर्वा केली नसल्याचे मोदी म्हणाले.