वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एका गटातील सामन्यांच्या यजमानपदाची ऑफर बीसीसीआयकडून उत्तराखंड क्रिकेट संघटनेला सोमवारी देण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेच्या यजमानपदासाठी जैव सुरक्षित वातावरणाची हमी देत हे सामने भरविण्याची ग्वाही उत्तराखंड क्रिकेट संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
डेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट अकादमी आणि कासीगा इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर गेल्या एक महिन्याच्या कालावधीपासून उत्तराखंड क्रिकेट संघटनेतर्फे आपल्या राज्याच्या पुरूष आणि महिला क्रिकेट संघांचा सराव सुरू आहे. उत्तराखंडमध्ये यापूर्वी क्रिकेटच्या हालचालींना प्रारंभ झाला असून कोरोना संदर्भातील सर्व नियमावलींची पाळणूक केली जात आहे, अशी माहिती उत्तराखंड संघटनेचे हंगामी सीईओ अमन सिंग यांनी दिली. देशातील क्रिकेट हंगामाला 1 जानेवारीपासून प्रारंभ केला जाईल, अशी सूचना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केली आहे.