भाजपने दाखविला बाहेरचा मार्ग
उत्तराखंडमध्ये भाजपमधील रस्सीखेच सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत राजीनामा देण्यापासून रोखण्यात आलेले वरिष्ठ मंत्री हरक सिंह रावत यांना पक्षाने बाहेरचा मार्ग दाखविला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने रविवारी रात्री उशिरा वक्तव्य जारी करत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरक सिंह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याची माहिती दिली. तर रावत यांची 6 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
यापूर्वी हरक सिंह यांनी स्वतःच्या मतदारसंघात सुविधांची मागणी करत राजीनामा दिला होता. परंतु त्यावेळी भाजप पक्षशेष्ठींच्या हस्तक्षेपामुळे त्यांनी तो मागे घेतला होता. तरीही हरक सिंह आणि मुख्यमंत्री धामी यांच्यात रस्सीखेच कायम असल्याची चर्चा होती.
कुटुंबीयांसाठी उमेदवारीची मागणी
हरक सिंह स्वतःच्या कुटुंबासाठी विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघांमध्ये तिकीटाची मागणी करत होते. यातील एक तिकीट पुत्रवधू अनुसूयाला मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु पक्षाने एक कुटुंब-एक तिकीट सूत्र समोर करत ही मागणी नाकारली होती. यामुळे नाराज हरक सिंह यांनी तिकीट वाटप चर्चेत भाग घेतला नव्हता.
काँग्रेसच्या वाटेवर
हरक सिंह रावत काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार असल्याचे मानले जात आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पोहोचून ते पक्षाचे सदस्यत्व घेणार असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यासाब्sात भाजपचे 2-3 आमदार काँग्रसमध्ये प्रवेश करू शकतात. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी हरक सिंह यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आणखीन अनेक आमदारांना भाजपमध्ये सामील करविले होते.
शाह अन् नड्डांच्या भेटीला
स्वतःच्या कुटुंबीयांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज हरक सिंह यांनी रविवारी नवी दिल्लीत धाव घेत पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत रायपूरचे आमदार उमेश शर्मा काऊ देखील होते. परंतु पक्षशेष्ठींकडून त्यांना कुठलेच ठोस आश्वासन मिळू शकले नव्हते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याने भाजप नेतृत्व त्यांच्यावर नाराज होते.