वृत्तसंस्था/ चेन्नई
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंड संघाने बाद फेरीत प्रवेश मिळविताना सोमवारी झालेल्या सामन्यात सिक्कीमचा 145 धावांनी पराभव केला. त्याचप्रमाणे आसाम, मेघालय, नागालँड यांनीही आपले विजय नोंदविले.
उत्तराखंड आणि सिक्कीम यांच्यातील सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने 50 षटकांत 8 बाद 306 धावा जमविल्या. कमल सिंगने 119, जय बिश्तने 54, मयांक मिश्राने नाबाद 32 धावा केल्या. सिक्कीमतर्फे वरूण सूदने 3 गडी बाद केले. त्यानंतर सिक्कीमने 50 षटकांत 6 बाद 161 धावा जमविल्या. निलेशने 58 तर थापाने 38 धावा जमविल्या. या सामन्यात उत्तराखंडने 4 गुण मिळविले. प्लेट विभागात प्राथमिक फेरीत उत्तराखंड संघाने आपली विजयी घोडदौड अखेरपर्यंत कायम राखत बाद फेरीत स्थान मिळविले. दरम्यान सरस गुण सरासरीच्या जोरावर उत्तराखंडने आसामला मागे टाकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात आसामने मिझोरमचा 182 धावांनी पराभव केला. आसामने 50 षटकांत 8 बाद 342 धावा जमविल्या. साहील जैनने 86, दासने 85, रॉयने नाबाद 56 केल्या. मिझोरमतर्फे प्रतिक देसाईने 3 गडी बाद केले. त्यानंतर मिझोरमचा डाव 43.5 षटकांत 160 धावांत आटोपला. हुसेनने 4 तर शर्माने 3 गडी बाद केले. या सामन्यात आसामला 4 गुण मिळाले.
मेघालयने मणिपूरचा 83 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मेघालयने 50 षटकांत 8 बाद 303 धावा जमविल्या. त्यानंतर मणिपूरचा डाव 48.4 षटकांत 220 धावांत आटोपला. मेघालयने 4 गुण मिळविले. या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात नागालँडने अरूणाचल प्रदेशचा 7 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अरूणाचल प्रदेशने 50 षटकांत 9 बाद 285 धावा जमविल्यानंतर नागालँडने 42.1 षटकांत 3 बाद 287 धावा जमवित विजयासह 4 गुण वसूल केले.
संक्षिप्त धावफलक
उत्तराखंड 50 षटकांत 8 बाद 306, सिक्कीम 50 षटकांत 6 बाद 161
आसाम 50 षटकांत 8 बाद 342, मिझोराम 43.5 षटकांत सर्वबाद 160
मेघालय 50 षटकांत 8 बाद 303, मणिपूर 48.4 षटकांत सर्वबाद 220
अरूणाचलप्रदेश 50 षटकांत 9 बाद 285, नागालँड 42.1 षटकांत 3 बाद 287.