ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच उत्तराखंडच्या मंत्री रेखा आर्य यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, मी कोरोनाची टेस्ट केली आहे. आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. मात्र सध्या माझी प्रकृती ठीक असून मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आयसोलेट झाले आहे. यासोबतच मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः ची कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, उत्तराखंडात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत प्रदेशातील 81,211 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 72,987 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 5,934 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1341 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.