ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडच्या चमोलीतील जोशींमठ येथे हिमकडा कोसळून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या 26 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. 27 जणांना वाचविण्यात यश आले असून, अजूनही 171 लोक बेपत्ता झाले आहेत. तपोवन येथील एका बोगद्यात जवळपास 35 कामगार अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडचे डिजीपी अशोक कुमार यांनी ही माहिती दिली.
आपत्तीग्रस्त तपोवनमध्ये सध्या आयटीबीपी, आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून मदत कार्य सुरू आहे. हा बोगदा आज दुपारपर्यंत खुला होईल. सध्या बोगद्यातील पाण्याची पातळी तपासून स्वच्छता केली जात आहे. हा बोगदा सुमारे 100 मीटर लांब असून 35 कर्मचारी बोगद्यात अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.