प्योंगयांग / वृत्तसंस्था
उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांचे निधन झाल्याचे वृत्त हाँगकाँगमधील वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. वृत्तवाहिनीच्या या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया याव्यतिरिक्त कुठल्याच देशांनी किम यांच्या निधनासंबंधीच्या वृत्तावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. किम जोंग उन यांच्यावर उपचारासाठी चीनने नुकतेच एक वैद्यकीय पथक पाठविले होते.
किम यांच्यावर दोन आठवडय़ांपूर्वी कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर किम यांची प्रकृती ढासळत असल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर चीनने एक वैद्यकीय पथक उत्तर कोरियात पाठविल्याने या चर्चेला बळ मिळाले होते. हे वैद्यकीय पथक किम यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासह डॉक्टरांसोबत चर्चा ही करणार असल्याची माहिती होती. हाँगकाँग सॅटेलाईन टीव्हीने किम जोंग उन यांचे निधन झाल्याचे वृत्त दिले आहे. या वृत्तासह त्यांनी किम यांच्या मृतदेहाची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. मात्र, त्याबाबत काहीच सत्यता पडताळण्यात आलेली नाही.
किम यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ठिक नव्हती. किम यांना लठ्ठपणाचा त्रास होता. तसेच ते अतिधूम्रपानाच्या आहारी गेले होते. किम हे 11 एप्रिल रोजी दिसले होते. किम यांचे आजोबा आणि उत्तर कोरियाचे दिवंगत नेते किम उल संग यांच्या जयंतीनिमित्त होणाऱया 15 एप्रिलच्या कार्यक्रमात त्यांची अनुपस्थिती होती.