ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियाच्या अधिकृत न्यूज एजन्सीने किम जोंग ऊन यांचा एका बैठकीतील फोटो शेअर केला आहे. त्या बैठकीत किम जोंग उन ठणठणीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे किम जोंग कोमात असल्याचा दक्षिण कोरियाचे माजी गुप्तचर अधिकारी चांग सोंग मिन यांचा दावा फोल ठरला आहे.
चार दिवसांपूर्वी चांग सोंग मिन यांनी किम जोंग कोमात असल्याचा दावा केला होता. त्याचदरम्यान देशाची धुरा त्यांची बहिण किम यो जोंग यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यामूळे किम जोंग यांच्याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. दोन महिन्यांपूर्वीही किम जोंग यांच्या प्रकृती अस्वास्थाबाबत आणि त्यांच्या निधनाबाबतचे वृत्त मीडियाने प्रसिद्ध केले होते. मात्र, नंतर किम जोंग प्रसारमाध्यमांसमोर आल्याने ते वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले होते.
कोरियन सेंट्रल न्यूज या वृत्तसंस्थेने किम जोंग ऊन यांचा पक्षाच्या काही सदस्यांसोबत बैठकीतील फोटो शेअर केला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि गुरुवारी होणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ते ही बैठक घेत आहेत. या फोटोत किम जोंग यांची प्रकृती चांगली असल्याची दिसत आहे. मात्र, हा फोटो नवा की जुना याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही.