ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियात सात महिन्यानंतर कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे हुकूमशहा किम जोंग उन यांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती तीन वर्षांपूर्वी उत्तर कोरिया सोडून पळून गेली होती. 19 जुलै रोजी या फरार व्यक्तीने बेकायदेशीररित्या सीमा पार करून उत्तर कोरियात प्रवेश केला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच किम जोंग उन यांनी शनिवारी पॉलिट ब्यूरोची आपत्कालीन बैठक बोलावली. यात कीसॉन्ग शहरात लॉकडाऊनसह टॉप क्लास अलर्ट जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यावर जानेवारी महिन्यातच उत्तर कोरियाने देशाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने उत्तर कोरियाने चीन सोबतचा व्यापारही पूर्णपणे थांबविला आहे. तसेच प्योंगयांगमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी एक महिन्यासाठी अलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.