2 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीचे निमित्त : ऑलिम्पिक अन् बायडेनवर
वृत्तसंस्था / टोकियो
जपानला लागून असलेल्या समुद्रात उत्तर कोरियाने बुधवारी दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे. उत्तर कोरियाच्या या कृतीनंतर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जपान आणि क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षेसाठी धोका निर्माण करण्यात येत आहे. उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची परीक्षण करण्यावर बंदी घातली आहे. तर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हे परीक्षण उत्तर कोरियाच्या अवैध शस्त्रास्त्र कार्यक्रमाचा हिस्सा आहे. तसेच हा प्रकार आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शेजारी देशांसाठीही धोकादायक आहे. स्थितीवर नजर ठेवली जात असल्याचे अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने गुरुवारी म्हटले आहे.
अमेरिकेला धमकी
तत्पूर्वी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किंग जोंग उन यांच्या बहिणीने दक्षिण कोरियासोबत सैन्याभ्यासावरून अमेरिकेला धमकाविले होते. पुढील 4 वर्षे शांतता राखायचे असल्यास कुठल्याही प्रकारची गडबड करू नका, असे तिने बजावले होते. दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र परीक्षणासंबंधी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जपानच्या सरकारनुसार एक क्षेपणास्त्र 450 किलोमीटरपर्यंत गेले होते. जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राला लागून असलेल्या भागात ते कोसळले होते. अशी माहिती जपानच्या सरकारने दिली आहे.
जपानमध्ये लवकरच क्रीडास्पर्धा
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्रांचे परीक्षण जपानमधील शांतता आणि स्थैर्यासाठी धोका आहे. जपानमध्ये ऑलिम्पिक मशाल रिलेची सुरुवात गुरुवारी झाली असताना परीक्षण झाले आहे. चार महिन्यांनी टोकियोत ऑलिम्पिक होणार आहे. ऑलिम्पिकवरून सुरक्षा निश्चित करू. तसेच पुढील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्याशी या मुद्दय़ावर चर्चा करणार असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या धोरणांना आव्हान
उत्तर कोरियाने 2018 पासून कुठल्याही प्रकारचे अण्वस्त्र आणि दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे परीक्षण केलेले नाही. तत्पूर्वी 2018 मध्ये उत्तर कोरियाचा हुकुमशहा आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती. उत्तर कोरिया सातत्याने आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करत आहे. याचमुळे अमेरिकेने मार्च 2020 मध्ये 28,500 हून अधिक सैनिक दक्षिण कोरियात तैनात केले होते.