ऑनलाईन टीम / प्योंगयांग :
उत्तर कोरियात टीव्हीवर परदेशी कार्यक्रम विशेषतः दक्षिण कोरियातील कार्यक्रम पाहिल्यास क्रूर शिक्षा दिली जाते. अशा व्यक्तींना अटक करून त्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. तुरूंगात मृत्यू झालेल्या कैद्यांना तिथेच जाळले जाते. त्या मृतदेहाची राख असलेले पाणी या कैद्यांना बळजबरीने पाजले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर कोरियातील मानवाधिकारांसाठी अमेरिकेत कार्यरत असलेल्या HRNK या संघटनेने एका कैद्याची मुलाखत घेतली. त्यामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या कैद्याने मुलाखतीत म्हटले आहे की, उत्तर कोरियातील चोंचरी छळ छावणीतील कैद्यांना जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. परदेशी वाहिनी पाहिल्यास तसेच ख्रिश्चन धर्माचे पालन केल्यास लोकांना अटक करून तुरूंगात ठेवले जाते. एकाग्रता शिबिर असे त्या तुरूंगाला नाव देण्यात आले आहे.
या तुरुंगात कैद्यांचा प्रचंड छळ केला जातो. त्यामुळे आठवड्याला एका तरी कैद्याचा मृत्यू होतो. दर सोमवारी मृत कैद्यांना जाळले जाते. चोंचरी छळ छावणीजवळच्या तलावात पावसाच्या पाण्याने ही राख त्या तलावात मिसळते. त्याच तलावातील पाणी कैद्यांना पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी दिले जाते असे, या कैद्याने सांगितले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या कैद्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे.