पुसेगाव / वार्ताहर :
पुसेगाव, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोरोना लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले आहे. आत्तापर्यंत साडेतीन हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले असून, अजूनही पाच हजाराच्यावर लसीची गरज आहे. मात्र, लसीचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर सुरू आहे. या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत निढळ, कटगुण, वर्धनगड, डिस्कळ, बुध यासह अनेक उपकेंद्रे कार्यरत आहेत. या भागात बाधितांचा आकडा वाढत असल्याने लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी टाळाटाळ करणारे नागरिक आता कोरोना प्रसार वाढल्याने मोठय़ा संख्येने लस घेण्यासाठी येत आहेत. पण लसीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने लसीच्या उपलब्धतेसाठी तातडीने उपाययोजना राबवून पुसेगाव प्रा. आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.