उत्तर गोव्याच्या अनेक भागात बत्ती गुल्ल : आजही सायंकाळी पावसाची शक्यता
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गेले आठ दिवस हैराण झालेल्या जनतेला सांयकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला. उत्तर गोव्यात वाळपई सत्तरी, केरी येथे सुरू झालेला पाऊस सायंकाळी पणजी वगळता सर्वत्र जारेदारपणे पडला. हवामान खात्याने आजही राज्यात सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
गेले आठ दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या जनतेला पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला. वाळपई, केरी, होंडा. सांखळी, ओल्ड गोवा, खोर्ली, माशेल, आमोणे, डिचोली, म्हापसा, पेडणे धारगळ आदी भागात सर्वत्र जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. वाळपईत जोरदार वाऱयासह पाऊस कोसळला. सांखळीत सुमारे अर्धातास पाऊस कोसळला. पाऊस पडताच अनेक भागातील वीज प्रवाह गुल्ल झाला होता.
हवामान खात्याने गोव्यात 22 व 24 मार्च रोजी पाऊस पडणार असल्याचे भाकित व्यक्त केले होते. गेले सलग तीन दिवस गोव्यात पावसाळी वातावरण होते. मात्र अवघ्या काही भागात गेल्या दोन दिवसांत तुरळक पाऊस पडून गेला. बुधवारी मात्र उत्तर गोव्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळला. राजधानी पणजीत पाऊस पडला नाही. आज सर्वत्र पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. सायंकाळी उशिरा सर्वत्र वीज प्रवाह पुन्हा सुरळीत सुरू झाला.
जोरदार पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आणि पारा खाली उतरला. आजही सर्वत्र ढगाळ हवामान राहील असा अंदाज आहे.