वार्ताहर/ खोल
उत्तर प्रदेशातील भाजप सरकारातील सहकारमंत्री असल्याचे भासवून डॉ. सुनील सिंग व भाजपाचे प्रदेश अध्यक्ष असल्याचे भासवून अजयकुमार यांनी गोवा शासनाचा शाही पाहुणचार घेतल्याचे उघड झाल्याने इतर गोमंतकीयांबरोबर खोलवासियांनाही धक्का बसला आहे.
आदर्श सहकारी कृषी संस्थेच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून खोल पंचायत सभागृहात आयोजिण्यात आलेल्या संस्थेच्या बक्षिसवितरण समारंभास वरील दोघांनी प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रातील संस्थांच्या विकासासाठी उत्तर प्रदेशच्या सहकार खात्याकडून मार्चपूर्वी 10 कोटी व एप्रिलनंतर 5 कोटी अनुदान दिले जाणार असल्याचे भाषणात घोषित करून उपस्थित सर्व शेतकरी व सहकार क्षेत्रातील प्रस्थापितांना आश्चर्याचा धक्का दिला होता. खोल परिसरात यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच त्या तोतया मंत्र्याला व साथीदारांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आले आहे.
खोल येथील सभागृहात या तोतया मंत्री महोदयांच्या हस्ते ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसे स्वीकारली होती त्यांना याचा तिटकारा येणे स्वाभाविक आहे. खोल येथील जागरूक नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांनी सदर तोतया मंत्री व त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आदर्श संस्थेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सूचनेनुसार सदर तोतया मंत्र्यांनी गोवा बागायतदार, मार्केटिंग फेडरेशन, सहकार भांडार व गोव्यातील अन्य अग्रेसर सहकारी संस्थांना भेटी दिल्यामुळे त्यांना संस्थेच्या बक्षिसवितरण समारंभाला पाहुणे म्हणून पाचारण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या शाही पाहुणचाराचा आपणासही नाहक भुर्दंड पडल्याचे वेळीप यांनी स्पष्ट केले.