पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर, मतदानपूर्व सर्वेक्षणाचे अनुमान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून या निवडणुकांचा कार्यक्रमही घोषित झाला आहे. या निवडणुकांचे परिणाम कसे असतील यासंबंधी सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने तिची अनुमाने प्रसिद्ध केली आहेत. या अनुमानांनुसार उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळू शकते. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर राहणार आहे. सध्या पंजाब सोडून सर्व चार राज्यांमध्ये भाजपचेच राज्य आहे.
या पाच राज्यांमधील मतदान प्रक्रियेचा प्रारंभ 10 फेब्रुवारीपासून होणार आहे. गोवा, उत्तराखंड आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीतील 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा असून पंजाबमध्ये 117, गोव्यात 40, मणिपूरमध्ये 60 तर उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत. मतगणना सर्व राज्यांमध्ये 10 मार्चला होत आहे.
उत्तर प्रदेश
सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेवर येऊ शकणार आहे. या राज्यात भाजपला 403 पैकी 223 ते 235 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला 145 ते 153 जागा मिळतील बहुजन समाज पक्ष आणि काँगेसला केवळ अनुक्रमे 8 ते 16 आणि बसपला 2 ते 4 जागांवर समाधान मानावे लागेल.
गोवा
गोव्यातील 40 जागांपैकी भाजपला 19 ते 23 जागा मिळतील. आम आदमी पक्षाला 4 ते 6 तर काँगेसला 3 ते 7 जागा मिळणार आहेत. इतर पक्षांना 2 ते 4 जागांवर संतुष्ट रहावे लागणार आहे, असे सर्वेक्षणाचे म्हणणे आहे.
उत्तराखंड
या राज्यात 70 जागा असून त्यापैकी भाजपला 31 ते 37 जागा मिळू शकणार आहेत. काँगेसला 30 ते 36 जागांची शक्यता आहे. आम आदमी पक्षाला 6 ते 8 जागा मिळतील तर इतरांना 2 ते 4 जागा मिळणे शक्य आहे.
पंजाब
पंजाबमध्ये मात्र त्रिशंकू विधानसभेची शक्यता आहे. येथे 117 जागांपैकी आम आदमी पक्षाला 52 ते 58 जागा मिळून तो पक्ष बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. येथे काँगेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 जागा तर भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळणे शक्य आहे.
मणिपूर
या राज्यात 60 जागा असून भाजपला त्यापैकी भाजपला 23 ते 27 जागा मिळू शकतात. तर काँगेसला 22 ते 26 जागा शक्य आहेत. एनपीएफला 2 ते 6 जागा तर 5 ते 9 जागा इतरांना मिळू शकतात. या राज्यात कोणालाही बहुमत मिळताना दिसत नसले तरी नंतर भाजप आणि एनपीएफ युती होऊ शकते.
मतगणना 10 मार्चला
सी-व्होटर या संस्थेने व्यक्त केलेली ही अनुमाने कितपत खरी ठरतील हे 10 मार्चला दुपारी 12 वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे. कारण त्या दिवशी सर्व 5 राज्यांमध्ये मतगणना हाती घेतली जाणार आहे. तोपर्यंत ही केवळ अनुमानेच राहणार आहेत. वस्तुस्थिती मतगणनेनंतरच स्पष्ट होणार आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा, किती मते…
उत्तर प्रदेश एकूण जागा 403
- भाजप 233 ते 235 (मते 42 टक्के)
- सप 145 ते 157 (मते 33 टक्के)
- बसप 8 ते 16 (मते 12 टक्के)
- काँगेस 3 ते 7 (मते 7 टक्के)
- इतर 2 ते 4 (मते 6 टक्के)
गोवा जागा 40
- भाजप 19 ते 23 (मते 32 टक्के)
- काँगेस 4 ते 8 (मते 20 टक्के)
- आम आदमी पक्ष 5 ते 9 (मते 22 टक्के)
- मगोप 2 ते 6 (मते 8 टक्के)
- इतर 2 ते 4 (मते 18 टक्के)
उत्तराखंड जागा 70
- भाजप 31 ते 37 (मते 39 टक्के)
- काँगेस 30 ते 36 (37 टक्के)
- आम आदमी पक्ष 2 ते 4 (मते 18 टक्के)
इतर 1 ते 3 (मते 6 टक्के)
पंजाब जागा 117
- आम आदमी पक्ष 53 ते 58 (मते 40 टक्के)
- काँगेस 37 ते 43 (मते 36 टक्के)
- अकाली दल 17 ते 23 (मते 18 टक्के)
- भाजप 1 ते 3 (मते 4 टक्के)
मणिपूर जागा 60
- भाजप 23 ते 27 (मते 35 टक्के)
- काँगेस 2 ते 26 (मते 33 टक्के)
- एनपीएफ 2 ते 6 (मते 11 टक्के)
- इतर 5 ते 9 (मते 21 टक्के)