ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मागील काही दिवसांपूर्वी कोरोनाने प्रदेशातील जेलमध्ये देखील शिरकाव केला आहे. झांसी जेलमध्ये एकाच वेळी 127 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानतंर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यात अजूनही तात्पुरते जेल बनवले नाही आहेत त्या जिल्ह्यांमध्ये लवकरच तात्पुरते जेल बनवले जातील. नव्या कैद्यांना या तात्पुरत्या जेल मध्ये ठेवले जाईल.
पुढे ते म्हणाले, नव्या कैद्यांना तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यापूर्वी त्यांची एंटिजेन टेस्ट केली जाईल. टेस्टमध्ये ज्या लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील त्यांना उपचारासाठी एल 1 कोविड रुग्णालयात दाखल केले जाईल. ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येथील त्यांना 14 दिवसांसाठी तात्पुरत्या जेलमध्येच क्वारंटाइन केले जाईल.
दरम्यान सध्या उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 74 हजार 83 इतकी आहे. तर 1497 लोकांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 27,934 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 44,520 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.