ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना अनेक राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आयाराम, गयारामांची ये जा सुरू झाली आहे. याचदरम्यान, उत्तर प्रदेशमधील पूर्वांचलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पूर्वांचलच्या राजकारणातील ब्राह्मण चेहरा म्हणून ओखळ असलेल्या हरिशंकर तिवारी यांचे कुटुंब आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.
हरिशंकर तिवारी यांचे दोन्ही पुत्र विनय शंकर आणि कुशल तिवारी हे लखनौमध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय संत कबीरनगर-खलिलाबाद येथील भाजप आमदार दिग्विजय नारायण चौबे ऊर्फ जय चौबे, करनैलगंज येथून भाजप उमेदवार असलेले संतोष तिवारी, विधान परिषदेचे माजी सभापती गणेश शंकर पांडे आणि कुशीनगर येथील भाजप खासदारांचे पुतणे हेसुद्धा आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.