- आत्तापर्यंत 54 जणांनी गमावले डोळे
ऑनलाईन टीम / नोएडा :
कोरोना व्हायरस संकटाबरोबरच आता उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. प्रदेशातील रुग्ण संख्येने 1 हजारचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत 54 रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत तर 80 जणांनी आपला जीव गमावला आहे.
यावरील औषधाचा साठा पूर्ण प्रमाणात उपलब्ध नसल्याने मोठी समस्या जाणवत आहे. शहरात काही भागात यावर औषध मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात चिंताजनक परिस्थिती आहे. औषध आणि इंजेक्शनच्या तुटवड्याची तक्रार अनेक ठिकाणी आहे.
- इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अनेकांनी गमावला जीव
गाझियाबाद मधील एका रुग्णांमध्ये तिन्हीं प्रकारच्या फंगसची लक्षणे दिसून आली होती. त्याचा जीव वाचवण्यासाठी इंजेक्शनची गरज होती. मात्र इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने संबंधित रुग्णाला आपला जीव गमावावा लागला. तसेच शाहजहापुरमध्ये देखील 5 रुग्ण आढळून आले. जो पर्यंत याबाबत माहिती मिळून त्यांना शहरात उपचारासाठी नेईपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला. याप्रमाणेच पीलिभितमध्ये 3 रुग्ण आढळून आले त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
- मुराबादमध्ये 17 रुग्ण, सर्व रुग्णांचे काढावे लागले डोळे
प्रदेशात फंगसचा सर्वात जास्त धोका मुराबादमध्ये दिसून आला. येथील 17 रुग्णांमध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे दिसून आली आणि सर्वांचे डोळे यामध्ये काढावे लागले. तर वाराणसी मधील एकूण 128 रुग्णांपैकी 28 जणांना आपला जीव गमवावा लावला आहे. तर 14 जणांचे डोळे काढावे लागले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
- निगेटीव्ह रुग्णांवर देखील ब्लॅक फंगसचा परिणाम
मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये सद्य स्थितीत 84 ब्लॅक फंगसचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील 33 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर 51 जण हे निगेटीव्ह आहेत. तरी देखील त्यांच्यामध्ये ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.
- एसजीपीजीआयमध्ये नोडल सेंटर
लखनऊमधील एसजीपीजीआयमध्ये ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी नोडल सेंटर बनविण्यात आले आहे. येथे 13 डॉक्टरांची एक टीम कार्यरत असून ते प्रदेशातील दुसऱ्या सेंटरमधील डॉक्टरांशी समन्वय साधून देखरेख करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ऑफिसर्सना हेल्पलाईन जारी करून देत रुग्णांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.