लखनौ / वृत्तसंस्था
भाजप उत्तर प्रदेशातील 2022 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निषाद पार्टी आणि अपना दल यांच्याशी युती करून लढणार आहे. भाजपने आतापासूनच विरोधकांना चितपट करण्यासाठी व्यूहरचना रचली असून मित्रपक्षांशी बोलणी सुरू केली आहेत. या चर्चांना अपेक्षित यश मिळत असून अपना दल आणि निषाद पक्षाची साथ भाजपला लाभणार आहे. पक्षाचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी यासंबंधीची घोषणा शुक्रवारी केली. मात्र यादरम्यान भाजप आणि निषाद पक्ष यांच्यात जागावाटपाबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
निषाद पक्षाशी युती करण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपने 2022 मध्ये मोठय़ा विजयाचा दावा पुन्हा केला. निषाद पक्षासोबत आमची युती आहे. तसेच अपना दल हा भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचाही एक भाग असेल. यासह, इतर अनेक पक्ष देखील आमच्या संपर्कात आहेत. आज त्याची अधिकृत घोषणा केली जात आहे. भाजपने समाजातील सर्व घटकांचा विकास केला आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची असून यावेळी राज्यात पुन्हा कमळ फुलणार असल्याचे प्रधान म्हणाले. ते गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशात आहेत.