- पाहिल्या नियमात कोणतेही बदल
ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात 31 जुलैपर्यंत फक्त दर वीकेंडला लॉक डाऊन सुरू राहणार अशी माहिती योगी सरकारकडून देण्यात आली. तसेच 16 ते 31 जुलै दरम्यान संपूर्ण लॉक डाऊन करण्याची कोणतीही योजना नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी सांगितले की, कोणताही नवा नियम लागू करण्यात आलेला नाही. 14 जुलै रोजी लागू करण्यात आलेला म्हणजेच दर शनिवारी आणि रविवारी लॉक डाऊन असेल. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर प्रदेशात संपूर्ण लॉक डाऊन असे मेसेज फिरत आहेत. त्या केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, 14 जुलै रोजी जारी करण्यात आलेले नियम तसेच असतील. यानुसार, शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत हे लॉक डाऊन असेल तसेच या काळात सर्व बाजार, मॉल आणि कार्यालये देखील बंद राहतील. मात्र, या काळात आरोग्य आणि चिकित्सा सेवा, आवश्यक सेवा पहिल्या प्रमाणेच सुरू राहणार आहेत.
तसेच आवश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्ती, कोरोना वॉरियर्स, स्वच्छता कर्मचारी, डोर स्टेप डिलिव्हरी करणारे कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने नसतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.