ऑनलाईन टीम / कन्नोज :
उत्तर प्रदेशातील कन्नोज जिल्ह्यात बुधवारी सकाळी मोठा अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नोज जिल्ह्यातील आग्रा लखनऊ एक्सप्रेस हायवेवर तालग्राममधील बेहटा जवळ आग्र्यातून आलेली आणि बंद पडलेली बस रस्त्यावर उभी होती. यावेळी युपीडा गस्ती पथक आणि एनसीसीचे कर्मचारी रस्त्यावर बॅरिकेट्स लावत होते. त्याचवेळी पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने गस्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांना चिरडले आणि शेजारील गाडीला जोरदार धडक दिली.
त्यानंतर नियंत्रण सुटलेला ट्रक उभ्या असलेल्या बसवर आपटला. या अपघातात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मृत व्यक्तींची ओळख पटली असून शैलश आणि सुदेश अशी त्यांची नावे आहेत. तिसऱ्या मृत व्यक्तींची ओळख अजूनही समजली नसून पोलिसांकडून शोध सुरू आहे.