ऑनलाईन टीम / उन्नाव :
उन्नावमधील आग्रा लखनऊ एक्सप्रेस वेवर औरास भागातील मैनिभावा गावात दाट धुके असल्याने रस्त्यात उभा असलेल्या कंटेनर ला एका डबल डेकर बसने मागून येऊन जोराची धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, बसमधून चाललेल्या 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
एसओ राज बहादुर सिंह यांनी या घटनेची अधिक माहिती देताना सांगितले की, या बसमधून जवळपास 70 ते 75 प्रवासी प्रवास करत होते. ही बस लखनऊ मधून दिल्लीला जात होती. या दाट धुक्यामुळे कंटेनर देखील एका वाहनाला धडकून रस्त्यात उभा होता. त्या कंटेनरचा चालक पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातात मृत झालेल्यांपैकी तिघांची ओळख पटली असून शिवम ( वय 25), मुतासिर आलम ( वय 25) आणि राम प्रकाश ( वय 45) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.