ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते उत्तर प्रदेशच्या निकालाकडे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात भाजप आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजपासमोर गेल्या निवडणुकीतील संख्याबळ राखण्याचं आव्हान आहे.
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता असणाऱ्या भाजपाने सुरुवातीच्या कलांमध्ये जबरदस्त आघाडी घेतली आहे. भाजपा २४० हून अधिक जागांवर पुढे असून सपादेखील१०८ च्या पुढे आहे.
उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी
भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 111 जागांवर आघाडी मिळालीय. अपना दल 12 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 8 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत 399 जागांचे कल हाती आले आहेत.
भाजपने गाठला बहुमताचा आकडा
भाजप २४३ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात योगी सरकार येण्याचे संकेत स्पष्ट दिसू लागले आहेत.
योगी आघाडी घेणार हे नक्की होतं – संजय राऊत
योगी आदित्यनाथ आघाडी घेणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तर अजूनही काय होईल हे सांगा येत नाही त्यामुळे उत्तर प्रदेशचा निकाल ५ नंतर स्पष्ट होईल त्यानंतर बोलणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले आहेत.
पहिल्या फेरीत अखिलेश यादव आघाडीवर
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भाजपाचे एसपी सिंग बघेल हे दुसऱ्या तर बसपाचे कुलदीप नारायण तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा २४० जागांवर आघाडीवर
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने २४० जागांवर आघाडी घेतली असून समाजवादी पक्ष १०८ जागांवर आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून आघाडीवर
सुरवातीला पोस्टल मतमोजणी सुरु झाली. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यदेखील त्यांचा मतदारसंघ सिरथूमधून आघाडीवर आहेत.