ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयातील 24 कर्मचाऱ्यांनी कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 20 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या मानसूत्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांच्या आदेशावरून सोमवारी अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसीएमओ डॉ. एम के सिंह यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्य विभागाची एक टीम सचिवालयात पोहोचली आणि त्यांनी जवळपास 620 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली. यामधील 24 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना बाधा झाली असल्याचे कळताच सचिवालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, सद्य स्थितीत सचिवालयात केवळ एक तृतीयांश कर्मचारी येत होते. ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे तसेच कार्यालयाचे देखील सॅनिटाईझेशन केले जाणार आहे.