कुठलेही शहर किंवा भागाचे वैशिष्टय़ जाणून घ्यायचे असल्यास तेथील रस्त्यांवर फेरफटका मारावा असे म्हटले जाते. उत्तर बंगालमधील शहरे, वस्त्या आणि तेथील रस्त्यांवर नजर फिरविल्यास या राज्यात, चहाच्या क्षेत्रात अननसाला पसंती असल्याचे आढळून येईल.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 4 टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारादरम्यान सत्तारुढ आणि विरोधकांदरम्यान वाप्युद्धही दिसून आले. निवडणुकीच्या काळात निर्माण झालेल्या कटूतेदरम्यान बंगालच्या सत्तेवर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा कब्जा कायम राहणार का भाजप कमळ फुलविण्यास यशस्वी ठरणार यासंबंधी चर्चा सुरू आहे.
उत्तर बंगालच्या राजकारणात चहाची चर्चा तर होतच आली आहे, पण एक असेही उत्पादन आहे, ज्याचा स्वाद देशविदेशात चाखला जातो. हे उत्पादन आहे अननस. पश्चिम बंगाल तसे तांदळासाठी प्रसिद्ध आहे, दक्षिण बंगालमध्ये भात हा लोकांचा पसंतीचा आहार आहे. पण या राज्यात अननसालाही मोठी पसंती दिली जाते. उत्तर बंगालच्या दार्जिलिंग आणि नजीकच्या जिल्हय़ांमध्ये अननसाचे पिक मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते.
पर्वतांची राणी म्हणून प्रसिद्ध दार्जिलिंगला अननस उत्पादक म्हणूनही ओळखले जाते.उत्तर बंगालच्या जिल्हय़ांमध्ये सुमारे 6 लाख मेट्रिक टन अननसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. पाइन ऍप्पल मर्चंट्स असोसिशएनच्या आकडेवारीनुसार अननसाचा वार्षिक व्यापार सुमारे 650 कोटी रुपयांचा असतो.
अननसाची होते निर्यात
उत्तर बंगालच्या अननसाचा देशाच्या अन्य भागांमध्येही पुरवठा होतो. येथूनच याची निर्यातही करण्यात येते. उत्तर बंगालमधील हे फळ नेपाळ आणि बांगलादेशात मोठय़ा प्रमाणात निर्यात करण्यात येते. स्थानिक बाजारपेठेतही अननसाची मोठी मागणी असते. नेपाळसोबत नकाशा वाद आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा काहीसा प्रभाव अननसाच्या निर्यातीवरही पडला होता. मर्चंट्स असोसिएशनने या शेजारी देशातील निर्यात बंद केली होती.
वर्षभर होते शेती
अननसाचे पिक काही ठिकाणी ठराविक काळातच घेतले जाते. पण बंगालमध्ये अननसाचे पिक वर्षभर घेण्यात येते. आकडेवारीनुसार उत्तर बंगालमध्ये 20 हजार हेक्टरपेक्षा अधिक भूमीवर अननसाचे पिक घेण्यात येते. पश्चिम बंगालच्या अननसाच्या एकूण उत्पादनात उत्तर बंगालचे योगदान सुमारे 80 टक्के आहे. या शेतीसाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष स्वरुपात सुमारे एक लाख जोडले गेले आहेत.
सिलिगुडीत संशोधन केंद्र अननसाचे तेथील अर्थव्यवस्थेतील मोठे योगदान आहे. अननसाच्या शेतीला उत्तर बंगालमध्ये गांभीर्याने घेतले जाते. शेतकऱयांची मागणी पाहता राज्य सरकारने सिलिगुडीच्या विधाननगरमध्ये अननस विकास आणि संशोधन केंद्र स्थापन केले आहे. अननसाच्या शेतीशी संबंधित लोक यावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी करत आहेत. उत्तर बंगालच्या निवडणुकीत चहाच्या मळय़ांशी संबंधित मुद्दे उपस्थित होतात, पण अननसाबद्दल चर्चा होत नसल्याची तक्रार लोकांची आहे.