दि. 15 रोजी करणार दुरुस्तीचे काम
प्रतिनिधी/ बेळगाव
हिडकल जलवाहिनीची गळती निवारणासाठी अनेकवेळा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पण दुरुस्तीचे पर्व संपता संपेनासे झाले आहे. यापूर्वी नवीन पंप जोडणी करताना 15 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून विविध कामे करण्यात आली. तरीदेखील कणबर्गी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. त्यामुळे दि. 15 रोजी पुन्हा दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
हिडकल जलाशयामधून शहराला पाणीपुरवठा करणाऱया विद्युत पंपांची क्षमता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे दररोज 18 एमजीडी पाणी मिळत आहे. नवीन विद्युत पंप बसविण्यासाठी दिवाळी सणाच्या तेंडावरच दहा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्या दरम्यान पंप बसविण्याबरोबर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा मंडळाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्याचप्रमाणे कणबर्गी येथील जवाहिनीची गळती दुरुस्त करण्यासाठी दोन वेळा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तरीदेखील कणबर्गी येथील गळतीचे निवारण झाले नाही. कणबर्गी येथील आणि राष्ट्रीय महामार्गाजवळ लागलेल्या गळतीचे निवारण करण्याचे काम दि. 15 रोजी हाती घेण्यात येणार आहे. याकरिता हिडकल जलाशयाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या उत्तर भागातील पाणीपुरवठय़ात दि. 15 व 16 रोजी व्यत्यय येणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा सुरळीत होणार नसल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.