खेडमध्ये घरे, गोठय़ांचे नुकसान, चिपळूण, दापोलीत हजेरी
प्रतिनिधी/ खेड, चिपळूण
बुधवारी पहाटेच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने खेड परिसरात नागरिकांची दाणादाणच उडवली. मेघगर्जना व विजांच्या चमचमाटासह पहाटे 4 पासून सलग दोन तास पावसाने झोडपून काढले. 6 वाजल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. सोसाटय़ाच्या वाऱयासह पडलेल्या या पावसाने आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात ठिकठिकाणी घरे व गोठय़ांची देखील पडझड झाली आहे. मात्र नुकसानीचा आकडा समजू शकला नाही. महामार्गावरील भरणे येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागली.
चिपळुणात मेघगर्जनेसह सरी
चिपळुणात बुधवारी पहाटे 4 च्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मात्र सकाळी ढगाळ वातावरण व दुपारनंतर कडक उन्हाने हजेरी लावली. पहाटे पावसाचे आगमन होताच काही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला होता. हा वीजपुरवठा सुमारे 8 तासाने पूर्ववत झाल्याने नागरिक हैराण झाले.
दापोलीमध्ये रिपरिप
दापोलीमध्ये रात्रीपासून सकाळी 9 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप आणि दिवसभर पावसाळी वातावरण कायम होते. मान्सूनपूर्व कामे प्रलंबित असल्याने केव्हाही पावसाचे आगमन होण्याच्या शक्यतेने शेतकरी, ग्रामस्थांची लगबग वाढली आहे.
आज जिल्हय़ात पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार गुरुवार 2 जून रोजी कोकणात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जना व सोसाटय़ाच्या वाऱयासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यापुढील तीन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे
मान्सूनच्या प्रवासाचा वेग हळूहळू वाढत आहे. राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा आला आहे. रत्नागिरी तालुक्यात 1 जून रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या पार्श्वभूमीवर होडय़ा बंदरात विसावल्या आहेत.
उत्तर रत्नागिरीत सरासरी 3 मि.मी. पावसाची नोंद
जिल्हय़ाच्या काही भागात दोन दिवस जोरदार मान्सूनपूर्व सरी कोसळल्या. उत्तर रत्नागिरीत सरासरी 3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये खेड 8 मि.मी., दापोली 2 मि.मी., गुहागर 2 मि.मी. तर चिपळूण परिसरात 15 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद बुधवारी सकाळी करण्यात आली.