वार्ताहर / दाभोळ
कोविड सेंटर मध्ये महिला रूग्णांच्या सुरक्षेसाठी तसेच, सीसीटिव्ही बसविण्यासाठी आणि गस्तीसाठी महिला पोलिसांच्या नेमणूका करण्यासाठी दाभोळ येथील उत्तर रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या वतीने दापोली पोलिस ठाणे तसेच प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात कोविड रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अशा कठीण परिस्थितीत कोविड केंद्रांमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे एकूणच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्या संदर्भात त्यांच्या अधिकार क्षेत्रात जेवढे कोविड सेंटर आहेत तेथे महिला पोलिस कॉन्स्टेबल नियुक्त करणे, केंद्राच्या आवारात सीसीटिव्ही बसविणे तसेच रात्रीच्या वेळी गस्तीसाठी महिला पोलिसांची नेमणूक करणे, या गोष्टींसाठी सदर निवेदन उत्तर रत्नागिरी भाजप महिला मोर्च्याच्या अध्यक्षा स्मिता जवकर यांचे हस्ते देण्यात आलेले आहे. यावेळी दापोली भाजप महिला तालुकाध्यक्षा निकीता शिंदे, नगरसेविका जया साळवी, श्रेया मुरकर, मधुरा तांबट, रोशना पेवेकर इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.